पैस पर्यावरण संवादाचा- वैश्विक आवाका, भारतीय संदर्भ
लेखक- संतोष शिंत्रे
प्रकाशक- मनोविकास प्रकाशन
पृष्ठे- ३५०
आजच्या घडीला अगदी सामान्य ज्ञानानुसारही 'पर्यावरणीय बदल' ही संज्ञा नवीन राहिलेली नाही. बालवाडीतल्या मुलांपासून ते कॉलेजात विविध स्तरावर विविध पद्धतीने या विषयाचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्यामुळे पर्यावरणीय बदलांविषयी एक सामान्य शहाणीव वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही अनेकदा एखाद्या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांविषयी जनसामान्यांच्या मनात गोंधळ दिसून येतो. पुरेशा प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पर्यावरण या विषयाचा संवाद सामान्य नागरिकांशी न साधल्यामुळे हा घोटाळा होतो. पर्यावरण पत्रकारितेचा दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या श्री. संतोष शिंत्रे यांनी आपल्या 'पैस पर्यावरण संवादाचा- वैश्विक आवाका, भारतीय संदर्भ' या पुस्तकात या विषयाचा सविस्तर धांडोळा घेतला आहे.
पर्यावरण हा विषय आज अगदी शाळेपासूनच्या शिक्षणात समाविष्ट झाला असला तरीही त्याबाबतची जागरूकता भारतात विशेष वाढलेली नाही. आज पर्यावरणवादी अराजकतावादी, विकासविरोधी किंवा डाव्या विचारांचे (दुर्दैवाने त्यात सत्यांश आहे) म्हणून कुख्यात झाले आहेत. अर्थात, त्याला बहुतांशी पर्यावरणवाद्यांचा निवडक संकुचित दृष्टीकोन कारणीभूत आहे. या पुस्तकातून सामान्य नागरिकांत पर्यावरण विषयाची जाणीव निर्माण करणे, ती वृद्धिंगत करणे, पर्यावरणीय प्रश्नांशी सामान्य नागरिकांना अधिकाधिक जोडून घेण्यासाठी विविध मार्ग सांगितले आहेत.
खरं म्हणजे या पुस्तकात केवळ पाठ्यपुस्तकाप्रमाणे माहिती न देता एकूणच पर्यावरणविषयक संवादाचा पैस विचारात घेतला आहे. लेखकाने या विषयाची पाच विभागात विभागणी केली आहे. प्रत्येक विभाग पर्यावरण संवादाच्या विविध कंगोऱ्यांना वाहिलेला आहे. लेखकाने पुस्तकाची सुरूवातच या विषयाचा एकूण आवाका किती मोठा आहे हे वाचकांपुढे मांडून केलेली आहे. त्यामध्येच याची व्याप्ती, गरज, तत्त्वे, प्रकार इत्यादी विषयांची चर्चा केली आहे. त्यानंतरच्या पुढच्या विभागांमध्ये पर्यावरणसंवादाची शास्त्रीय माहिती, त्याबरोबरच त्याच्याशी निगडीत असणारे अन्य सिद्धांत यांचाही उत्कृष्ट उहापोह केला आहे. ग्राहकांच्या पर्यावरणप्रेमी वस्तू खरेदी करण्याच्या निर्णयावर परिणाम करणाऱ्या विविध कारणांची उत्तम चर्चा केलेली आहे. ती वाचताना आपोआपच आपण अंतर्मुख होऊन आपल्या कोणत्याही खरेदीमागील प्रेरणेचा विचार करतो. त्यात कधी पर्यावरणीय परिणाम असा विचार मनात येतो का विचार डोकावून जातो. कोणत्याही उत्तम संवादात आवश्यक असते ती भाषा. पर्यावरणासारखा विषय लोकांपुढे मांडताना निवडाच्या भाषेविषयी लेखकाने सखोल विचार केलेला दिसतो. त्याबरोबरच आपल्या विषयाची मांडणी, तो प्रसिद्ध करण्यासाठी कोणत्या व्यासपीठांचा वापर केला जाऊ शकतो या सर्वांवर अत्यंत लक्षवेधी भाष्य केले आहे. वस्तुतः केवळ पर्यावरणच नाही तर अन्य कोणत्याही क्षेत्रातील संवादासाठी मूलभूत सिद्धांत समोर मांडले जाऊन उपयुक्त ठरावं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे.
पुस्तकाच्या सुरूवातीलाच लेखकाने पुस्तकाच्या भाषेबाबत माहिती दिली आहे. पुस्तक मराठी असलं तरीही अकारण प्रत्येक संकल्पनेचं मराठीकरण करण्याच्या फंदात लेखक पडलेले नाहीत. त्यामुळे पुस्तक वाचायला सुलभ राहते. काही ठिकाणी मराठीत शब्दशः भाषांतरीत होणाऱ्या संज्ञा वापरण्याऐवजी सुलभ शब्द निवडीवर भर दिला आहे. तर काही ठिकाणी चक्क इंग्रजी शब्दही ठेवले आहेत. एकूणच पुस्तक आपल्या चल भाषेत वाचनीय राहिल, शब्दांमुळे वाचनाची लय बिघडणार नाही याची काळजी घेत या पुस्तकाची रचना लेखकाने केली आहे.
तरीही पुस्तकाबाबत खटकणाऱ्या काही गोष्टी शिल्लक राहतातच. पुस्तकाचा लसावि पाहता काही काही ठिकाणी लेखकास मूलतः राजकीय लिखाण करण्याची इच्छा होती मात्र कुठल्यातही अज्ञात कारणामुळे पर्यावरणीय लेखनाकडे झुकले की काय अशी शंका येते. भारतात २०१४ मध्ये लोकशाही मार्गाने सत्ताबदल झाला तो आता त्यावर तप उलटून गेलं तरी काही लोकांच्या पचनी पडलेला नसावा. त्यामुळे अनेक विषयांत खुसपट काढल्यासारखा मुद्दा रेटवला जातो. पुस्तकामध्ये या क्षेत्रात (लेखकाच्या दृष्टीने सुमार) कामगिरीविषयी लिहीताना आवर्जून (तरिही थेट उल्लेख टाळत) बदललेल्या सरकारचे अस्तित्त्व लक्षात आणून द्यायचे, परंतु काही चांगले घडले असेल तर ते मात्र ‘भारत सरकार’ असा उल्लेख करत तटस्थ करायचे. ही निवडपूर्ण तटस्थता अतिशय खटकणारी होती आणि ही संपूर्णपणे टाळण्यासारखी होतीच. अन्यथा स्पष्टपणे टीका करणारे प्रकरणच जोडून लिहायचे. अशा प्रकारची दुटप्पी भूमिका घेतल्याने (माझ्या दृष्टीने) पुस्तकावर अकारणच राजकीय बाजू घेतल्याचा बट्टा बसला, जो टाळता आला असता.
त्यानंतर येतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचा. यातील 'ग्रीनपीस' या संस्थेचे तोंडभरून केलेले कौतूक वाचले परंतु इंटरनेटवर या संस्थेचे 'कारनामे'ही दिसतात. मोठे उद्योगसमूह हरित धुळफेक करतात त्यामुळे त्यांची नीट माहिती घेतली पाहिजे अशा अर्थाचे मत मांडणारा लेखक, याच हरित धुळवडीत काही कथित पर्यावरणवादी संस्था सामिल होतात त्यांच्याबद्दल का लिहीत नाही? या संस्थांना काय म्हणून स्वच्छ मानून त्यांच्या हेतूंवर शंका घेऊ नये? उद्योजकाप्रमाणे सामान्य नागरिकांनी या संस्थांचे 'राजकीय आश्रयदाते' कोण, 'बोलविते धनी' कोण याचा तपास का करू नये? या प्रश्नाला पूर्णपणे बगल देऊन या संस्था अत्यंत निरागस असल्याचा आव आणून लेखकाने संस्थांविषयी मांडलेली मते जशीच्या तशी घेण्यास योग्य नाहीत. त्याबरोबरच अनेक उद्योगांना 'टोणगे', 'राक्षसी', 'उद्योगमार्तंड' असली शेलकी विशेषणे वापरलेली खटकली. अत्यंत स्पष्ट लिहायचे तर १४० कोटी लोकसंख्येच्या या अर्थव्यवस्थेत लक्षणीय म्हणावी अशी कोणती सकारात्मक भर या पर्यावरणप्रेमी संस्था घालतात? खुद्द लेखकाने पर्यावरण चळवळीच्या यशस्वीततेची व्याख्या म्हणजे एखादा प्रकल्प रद्द होणे ही मानली असावी अशी शंका येते; पण त्या प्रकल्पाचे रोजगारापासून ते आर्थिक वृद्धीवर होणाऱ्या परिणामांकडे अन्य कथित पर्यावरणाचे लाडले कायम सोयीस्कर दुर्लक्ष करतात हा दुटप्पीपणा नव्हे? भारतातील नुकतेच घडलेले उदाहरण द्यायचे तर तामिळनाडूतील वेदांताचा तांबं निर्मिती करणारा प्रकल्प पर्यावरणलाडल्यांनी बंद पाडला. परिणाम? त्या गावातील मोठी लोकसंख्या बेरोजगार तर झालीच पण एकेकाळी तांबं निर्यात करणाऱ्या भारताला आता अन्य देशांतून तांबं आयात करावं लागतं. देशाच्या तिजोरीवर पडलेला या अतिरीक्त भाराची जबाबदारी पर्यावरणलाडले घेतील? ज्या मेट्रो प्रकल्पाचं उदाहरण लेखकाने दिलं त्या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत वाया गेलेल्या त्या दोन वर्षांमुळे कैक हजार कोटी रुपयांनी वाढली. तो अतिरिक्त बोजा हे पर्यावरणलाडले घेतील? अशा विविध प्रकल्पातील परिणामांची जबाबदारी कोण स्विकारेल? मग कोणतीही जबाबदारी न घेणाऱ्या पर्यावरणलाडल्या संस्थांची नेमकी मर्दुमकी ती कोणती? मात्र लेखकाने खरोखर पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांची माहिती वाचकांना पुरवली आहे हे फारच चांगले केले हे सुद्धा आवर्जून नमूद केले पाहिजे. मग ते तस्करांना वनसंरक्षक बनवणारे अधिकारी असोत वा विदर्भातील, ईशान्य भारतातील कोणत्यातरी पक्षाच्या संवर्धनासाठी काम करणारे निसर्गप्रेमी असोत- त्यांच्या कार्याची उत्तम माहिती लेखकाने दिली आहे.
अशा काही गोष्टी जर टाळल्या तर पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. वाचकांनी नीरक्षीरविवेकाने पुस्तकातील अनेक सकारात्मक पैलू नक्की आत्मसात करावेत. वस्तुतः या पर्यावरणलाडल्यांचा हा बुरखा फाडायला लेखकानेच दिलेल्या विविध मार्गांचा अत्यंत कौशल्याने वापर करावा. एकूण पुस्तक मार्केटिंग क्षेत्रासाठी उपयुक्त तर नक्कीच ठरेल त्याबरोबरच त्यातील पर्यावरणविषयक संकल्पनांमुळे या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शकही ठरेल यात शंका नाही.