लेखक- पु. ल. देशपांडे
प्रकाशक- साकेत प्रकाशन
पृष्ठे- २२३
किंमत- रुपये २५०
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकाबद्दल काय लिहीणार. पुलं बंगाली भाषा शिकण्यासाठी १९७० साली शांतिनिकेतनात रहायला गेले, त्या निवासाची ही स्मृती-चित्रे.
अर्थात, केवळ शांतिनिकेतनातली आठवण अशा शब्दांत या पुस्तकाचं वर्णन करणं शक्यच नाही. ही संपूर्ण शांतिनिकेतनचीच आठवण आहे. तिथल्या वाचनालयापासून ते भोजनालयापर्यंत! शांतिनिकेतनातील वाच्य पदार्थ ते खाद्य पदार्थ या सर्वांचं पुलंनी त्यांच्या खास मिश्किल शैलीत वर्णन केलं आहे. पुलं बंगालात गेले ते सलील घोष या त्यांच्या मित्राच्या आणि कुटुंबाच्या आधाराने. त्यामुळे सलिल घोष यांचे वडिल बंधू शांतिदेव घोष यांच्या घरी देखील पुलंचे येणे-जाणे राहिले. शांतिदेवांच्या घरच्या मैफिलींची अप्रतिम वर्णने आहेत. सलिलच्या आग्रहाने पौषातली फुलती पहाट पहायला पुलं गेले, त्याचं अविस्मरणीय वर्णन आहे.
थोडक्यात तीन महिन्यांच्या काळात पुलंनी जे काही बंगाल अनुभवलं त्या सगळ्याबद्दल लिहीलं आहे. त्यात आलेले काही राजकीय अनुभव सुद्धा आहेत. पहिल्या तीन महिन्यांच्या अनुभवांनंतर पुलं परत एकदा गेले होते, मात्र तोपर्यंत डाव्या चळवळींनी बंगालची पार वाताहात केली होती, त्यामुळे ते अगदी लवकर परतले. त्या पंधरा दिवसांबद्दलही त्यांनी उपसंहारात लिहीलं आहे.