- गिरीश कुबेर
(राजहंस प्रकाशन)
साऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा चालतो तो तेलावर. या तेलाचे भाव अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उभ्या करतात किंवा पार बसवतात. तेलाचे सर्वोत्कृष्ट प्रतीचे आणि सर्वात मोठे साठे पश्चिम आशियाच्या वाळवंटात सापडतात आणि तिकडे पलिकडे व्हेनेझुएला नावाच्या देशात. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या गरजा वाढलेल्या. पश्चिम आशियात आपल्या अर्थव्यवस्थेत सलग तेल ओतू शकणारी अमेरिकाधार्जिणी राजवट त्यांना हवीच होती. अमेरिकी तेलकंपन्यांनी आपला फायदा काम ठेवण्यासाठी या प्रांतात व्हाईट हाऊसच्या मदतीने भरभक्कम राजकारण खेलले. त्या सगळ्या खेळाची ही कथा आहे.
अमेरिकेच्या आणि त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन निर्णय घेणाऱ्या ब्रिटनच्या विरोधात तेलवाल्या देशांना एकत्र बांधून संपूर्ण जगाचा तेलगाडा एकहाती रियाध मधून हाकणाऱ्या तेलियाची ही कहाणी आहे. या कहाणीत अनेक लोक जोडलेले आहेत. अमेरिकेच्या जवळच असलेल्या व्हेनेझुएलाचे पेरेझ अल्फान्झो, त्यांना समकालीन असणारे सौदीचे अब्दुल्ला तारिकी, ज्यांनी ओपेकचा पाया घातला. अमेरिका आणि ब्रिटनच्या कंपन्यांच्या नाकात पहिल्यांदा वेसण घालणारा तेलिया महमंद मोसादेघ वा त्यांना विरोध करून करून अटक करणारे इराणचे शहा महंमद रझा पहलवी त्यांची कहाणी आहे. जगातला सर्वात तेलसंपन्न देश म्हणजे सौदी अरेबिया. पहिले सौद अब्दुल अझीझ इब्न सौद जे या देशाचे संस्थापक होते. या देशातल्या तेलाचा वास आल्यावर अमेरिकेतल्या चार बड्या कंपन्या धावल्या. पुढे सत्तेत आल्यावर राजे फैझल आणि त्यांचे तेलमंत्री शेख अहमद झाकी यामानी यांनी ओपेकला मोठं तर केलंच पण पुढचे २५ वर्षं तेलाचं स्फोटक राजकारणही हाताळलं. या ओपेकमध्ये आज ११ सदस्य आहेत. त्यातले आपापसातले संबंध, त्याचे राजकारणावर होणारे परिणाम यांचं वर्णन पुस्तकात आहे. त्याशिवाय आपल्या भौगोलिक स्थानाचा वापर करून इजिप्तचे अब्दुल गमार नासर, त्यांच्यानंतर सत्तेत आलेले अन्वर सादात, लिबियातले कर्नल मुअम्मर गडाफी, इराणचे शहा महंमद रझा पहलवी, त्यांचे तेलमंत्री डॉ. अमुझगर, जॉर्डनचे राजे हुसैन या सगळ्यांच्या भूमिकांचा जगाच्या राजकारणावर फार दूरगामी परिणाम झाला. या सगळ्याचा गुंतागुंतीचा सविस्तर ऊहापोह या पुस्तकात समाविष्ट केला आहे.