एक पत्र सुनीताताईंना...

एक पत्र सुनीताताईंना...

दिनांक- १२ जून २०२६

आदरणीय सुनीताताई,
आदरपूर्वक नमस्कार!


    आज आमच्या भाईआजोबांना जाऊन २६ वर्षं झाली. तुम्ही गेलात त्यालाही आता १७ वर्षं होत आली. सध्याच्या वेगवान युगात एखादी गोष्ट कथित ट्रेंडिंग होते.... ट्रेंडिंग! पण त्या ट्रेंडची गंमत अशी की पुढच्या काही दिवसांत, महिन्यांत आणि फारच भाग्य लाभलं तर वर्षंभरात ती निघूनही जाते. अशा काळात भाईआजोबा नसूनही गेली २६ वर्षं आमच्यासारख्या तरूणांच्याही मनात घर करून आहेत.
    आता माझंच बघा ना, माझा जन्म १९९७ चा! माझे मित्रही असेच १९९० ते २००५-०६ पर्यंत जन्मलेले! म्हणजे आम्ही कोणीही प्रत्यक्ष भाईआजोबांना बघितलंही नाही, पण आम्ही त्यांच्यावर तितकंच प्रेम करतो. अनेक बाबतींत भाईआजोबा आमच्या आठवणीत आहेत. काळानुरूप जरा पद्धत बदलली इतकंच! तुम्ही १२ नोव्हेंबर २००० रोजी लिहीलेल्या पत्रात भाईंना विचारलंत,
तू गेलास, उद्या मीही नाहीशी होणार. पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द, मराठी भाषा जिवंत असेपर्यंत, स्वतःच्या तेजाने चमकत राहील ना?
सुनीताताई, मराठी भाषा असेपर्यंतच तर मी सांगू शकत नाही. पण आजही भाई आजोबांचा एक एक शब्द नुसत्या तेजाने चमकत नाही तर लखलखत्या तेजाने झळाळतो आहे.
आजही मी दादरमध्ये हिंडतो तेव्हा माझी नजर ‘आठवले- शहाडे आणि मंडळी’ दिसतात का शोधत असते. गिरगावात गेलो तेव्हा कांदेवाडी, धसवाडी, ठाकूर द्वार अशी नावं वाचल्यानंतर एका क्षणात माझ्यासमोर ‘धोंडो भिकाजी जोशी’ आठवतो. मागे एकदा पुण्यात असताना एका फोनवर समोरचा माणूस मला म्हणाला, “मी डॉ. गटणे बोलतोय.” काय सांगू... तोंडावर आलेलं “सखाराम का?” अर्थातच त्या फोनवर पुढे बोलणं काही मला शक्य नव्हतं आणि आजही तितकंच अशक्य आहे! एखाद्या लग्नात धावपळ करणारा माणूस ‘नारायण’ दाखवून जातो, कुठे केव्हातरी ‘अंतू बर्वा’ दिसतो. एकदा रेल्वे मार्गात म्हशी आल्याने भारतीय रेल्वेच्या अत्याधुनिक वंदे भारतचा तीन तास खोळंबा झालेला वाचला आणि “तीन तास! खुळा की काय तू झंप्या! मागे हातखंब्यास कोंबडी मारली यष्टीन् तर तीन तास खाल्लेनीत. एका कोंबडीस तीन तास तर म्हशीस किती? घाल गणित, धर बोटें.... हो आडवा संध्याकाळपत्तर!” अशा चालीवर, “एका यष्टीस साडे सहा तास (पहा मधु मलुष्टे यांनी इन्स्पेक्टर साहेबांवर मारलेले हाप पास्ट सीक्स आवर्स हे उद्गार) तर रेल्वेस किती?” असे गणित घालणारे दुसरे ‘बगूनाना’ त्या गाडीत असतील का असंही वाटून गेलं. किती किती उदाहरणं सांगू? इतकी वर्षं झाली तरी ‘पु.ल. देशपांडे’ हे नाव आमच्यावर राज्य करणारंच आहे. म्हणून ‘वाऱ्यावरची वरात’ जेव्हा नव्या संचात आणलं तेव्हा लोकांनी गर्दी करून पाहिलं. तुमच्याशी संबंधित असणारा डॉ. समीर कुलकर्णी यांच्या जीवनातील खरा प्रसंग जेव्हा ‘प्रिय भाई एक कविता हवी आहे’ या रूपाने सादर होतो तेव्हा लोक कौतुकाने अनेकदा बघायला जातात. ‘नक्षत्रांचे देणे – पु ल देशपांडे’ अशा नावाने कार्यक्रम लागला की मुंबईतील षण्मुखानंदलाही गर्दी होतेच होते. माझ्याबाबत सांगू तर, माझ्या बालपणाची सुरूवातच ‘नाच रे मोरा’ पासून झालेली (या नाच रे मोरा वरून आठवलं. आता यंदा जेव्हा आशाताईपण गेल्या तेव्हा लक्षात आलं की या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायिका तिघेही गेले आणि उगाचच बालपण अधिकृतरित्या संपलं असं वाटून गेलं.) नवीन वाद्य शिकायला सुरूवात केली की त्यावर ‘कबिराचे विणतो शेले’ वाजवून बघायचा मोह होतो.
आमच्या काळात पद्धती बदलल्या. आम्ही पुलंच्या नावाने इन्स्टाग्राम पेज चालू केलं, फेसबूक पेज चालू केलं. त्या पेजवर पुलंचे लेख, भाषणे, कितीतर गोष्टी टाकल्या जातात. काळजी नका करू, बहुदा ते कॉपीराईट बाबत एकदम जागरूक आहेत. मागे एका मुलाने पुलंच्या विविध पात्रांची छबी वापरून सुंदर दिनदर्शिका बनवली होती. व्हॉट्सॅपवर पुलंचे स्टीकर्स बनवले, मीममध्येही पुलंचे उद्गार आठवतात. आमच्या रोजच्या वापरात पुलंची कितीतरी वाक्य असतात. अर्थात काही खोडसाळ मंडळी स्वतःचे तद्दन रद्दी विनोद त्यांच्या नावावर खपवायला बघतात, पण अनेक ‘पुलं’प्रेमी असले वात्रट प्रकार बिलकुल खपवून गेत नाहीत- चिंताच करू नका! मला सांगा हे लखलखीत तेजाने झळाळणं नाही तर दुसरं काय? 
एखादा माणूस गेल्यानंतर २६ वर्षांनीही लोकप्रिय असतो, ही किती सुंदर गोष्ट आहे ना! जिथे चालू गोष्टी काळाच्या बाहेर टाकल्या जातात तिथे अजिबात निर्मिती न करणारा कोणीतरी पुन्हा एकदा कालप्रवाहात येतो, वारंवार येतो आणि येतच जातो. अहो, जिथे पोष्ट बदललं तिथे कोणाचं लिखाण किती काळ टिकेल हे मी पामर तरी कसं सांगणार? पण एक मात्र नक्की, माझी पिढी जिवंत असेपर्यंत भाईआजोबा आमच्यासोबत कायम राहतील..... अगदी शेवटच्या श्वासापर्यंत!
पुलंचा मनःपूर्वक चाहता आणि अत्यंत कृतज्ञ असलेला,
प्रणव पटवर्धन.